मुंबई: १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे.
सीबीआयचे अनिल देशमुखांच्या घरावर छापेदरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्यास सांगायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलिसांना बंगल्यावर बोलवायचे, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता.