ठाणे - केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी दुपारनंतर कारवाई केली आहे. दिवसभरातील ही मोठी कारवाई असून, ईडीने त्यांची ६. ४५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पीएमएलए ऍक्टनुसार ईडीने ही ठाण्यात कारवाई केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील ११ सदनिका ईडीकडून सील करण्यात आल्या आहेत. ईडीने पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीवर ही मोठी कारवाई केली आहे. पाच बँकेतील खाती आणि शेअर्स देखील सील केली आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हाती एक वेगळा मुद्दा हाती लागला आहे.
या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले असून श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याबाबत माहिती दिली आहे. हे ट्विट त्यांनी संपुर्ण इंग्रजीमध्ये केले मात्र, त्यांनी साला हा शब्द जाणीवपुर्वक लिहिलेला दिसतो. घोटाळेबाजोको छोडेंगे नही असा इशारा त्यांनी ट्विटमधून दिला.