अश्लील फिल्म बनविणे (Porn Film) आणि त्यांचे काही अॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे. (Raj kundra arrested by mumbai police for creation of pornographic films and publishing.)
मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. या कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकुर (२६), वंदना रविंद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापाठोपाठ टँनला बेड्या ठोकल्या आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत. तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फ़िल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या अटकेनंतर कुंद्रा तपास यंत्रणाच्या रडारवर आले. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सोमवारी त्यांच्याकड़े चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सोमवारी रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या वृत्ताला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुजोरा दिला आहे.