मुंबई - सायरस मिस्त्री गच्छंती प्रकरणात आपली बदनामी केल्याचा आरोप करत नस्ली वाडिया यांनी रतन टाटा व टाटा सन्सच्या संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला भरला होता. त्या खटल्याची कार्यवाही हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे जेष्ठ उद्योगपती रतन टाटासंंह टाटा ग्रुपला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. रतन टाटांसह काही संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यासंदर्भात दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहेत.
उद्योजक रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या अन्य संचालकांविरोधात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीचा हा खटला होता. वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्यावेळी टाटा समुहाच्या संबंधित संचालकांनी वाडिया यांच्याविरोधात काही वादग्रस्त विधाने केली होती, असा आरोप वाडिया यांनी या दाव्यामध्ये केला होता. या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली होती. या दाव्याविरोधात टाटा यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.