मनसुख हिरेन प्रकरणात तपासासाठी एटीएसची टीम गुजरातमधील अहमदाबादमध्ये पोहचली आहे. मनसुख यांची ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतदेह सापडला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक होते मनसुख हिरेन. त्यांची चौकशी देखील सचिन वाझे यांनी केली होती. मात्र, चौकशीदरम्यान त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. क्रिकेट बुकी असलेल्या गोरने गुन्ह्यासाठी ५ बेनामी सिमकार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करून दिले असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच मनसुख हिरेन यांचा मोबाईल ४ मार्चपर्यंत सुरु होता. बुकी नरेश याने पुरवलेली बेनामी सिम कार्ड गुजरातमधील असल्यामुळे मनसुख प्रकरणी अहमदाबाद कनेक्शन समोर आलं आहे. मनसुख हिरण प्रकरणात एकूण १४ सिमकार्ड पुरविणारा गुजरात येथील व्यक्तीस एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
तसेच अहमदाबादमधील तपासादरम्यान एटीएसने ८ सिमकार्ड जप्त केली आहेत. बुकी नरेश गोर याने दिलेल्या ५ सिमकार्डपैकी एक सिमकार्ड हत्या करणाऱ्यास दिला होता असून मनसुख यांना ४ मार्चला सकाळी ८.२० वाजता नरेशने Whats App कॉल केला होता. विनायक शिंदेने मनसुख यांना कांदिवली क्राईम युनिटचा पोलीस तावडे म्हणून सांगून शेवटचा कॉल करून घोडबंदर येथे बोलावले होते असल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं आहे. सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना पुरवलेली सिमकार्ड ही गुजरातमधील असल्याचं समजत आहे. या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून एटीएसने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली. आरोपी विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कर्मचारी असून त्याला २००७ साली वर्सोवा येथे लखनभैय्या कथित चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मी २०२० पासून शिंदे पॅरोलवर आहे. रजेवर आल्यानंतर ते या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे यांच्या संपर्कात असून त्यांच्या बेकायदेशीर कामांत त्यांना सहकार्य करायचा. मनसुख कटात आणखी कोण सहभागी आहेत. तसेच कटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याबाबत एटीएस सखोल तपास करत आहे. अटक दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे.