नवी दिल्ली – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय, एनसीबी आणि ईडीसारख्या राष्ट्रीय संस्था तपास करताना अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर संशय घेतला, तिला अटक झाली असली तरी सुशांत प्रकरणाशी अजून खुलासा झाला नाही, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता सीबीआयसाठी प्राधान्य राहिलं नाही असा दावा सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूतचे वकील विकास सिंह म्हणाले की, आम्हाला सुरुवातीपासून सुशांत प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी जाऊ नये असं वाटत होतं, पण ज्यावेळी पटणा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासात अडथळे आणण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यानंतर आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली. मात्र आता या प्रकरणाला सीबीआय प्राथमिकता देत नाही. सीबीआय टीम आणि एम्सची टीम एकाच शहरात असूनही अनेक दिवसांपासून एकमेकांना भेटली नाही. यामुळे हे स्पष्ट आहे सीबीआयसाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरण प्राधान्याने घेण्यासारखे नाही असा आरोप त्यांनी केला. इंडिया टुडे यांनी याबाबत बातमी दिली आहे.
यापूर्वीही विकास सिंह यांनी सीबीआयद्वारे सुशांत प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यापासून ते हत्येच्या तपासापर्यंत विलंब केला आहे. त्यामुळे आता आमचं मानसिक खच्चीकरण होत आहे. जे डॉक्टर एम्सच्या टीममध्ये आहेत. त्यांनी मी सुशांतच्या मृतदेहाचा फोटो पाठवला होता. त्यांनी मला सांगितले की, २०० टक्के सुशांतला गळा दाबून मारण्यात आलं आहे. ही आत्महत्या नाही असं ते म्हणाले.
तर या प्रकरणात सीबीआयचं म्हणणं आहे की, सुशांत प्रकरणाच्या मृत्यूशी निगडीत सर्व बाबींचा तपास सुरु आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास प्रोफेशनलपद्धतीने केला जात आहे. सर्व बाजू तपासल्या जात आहेत. सांगितलं जात आहे की, या प्रकरणात सीबीआय आता सुशांतच्या कुटुंबाची आणि बहिणींशी चौकशी करणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला
सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र गेल्या दीड महिन्यापासून तपासात कोणतीही हालचाल दिसत नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस प्रोफेशनल पद्धतीने आणि चांगल्यारितीने करत होती, त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्हीही उत्सुक आहोत, सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा संभ्रम लोकांमध्ये आहे असा चिमटा त्यांनी काढला.
तसेच सीबीआयच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहतोय, हा तपास दीड महिना झाला सीबीआयकडे आहे त्यामुळे तपास कुठपर्यंत आला याची आम्हाला उत्कंठा आहे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुखांनी विरोधकांना नाव न घेता लगावला आहे. यावर सीबीआयने प्रेस नोट काढून उत्तर दिलं आहे. सीबीआयनं सांगितलं आहे की, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सीबीआय प्रोफेशनली तपास करत आहे. या प्रकरणातील सर्व बाबींकडे पाहिले जात आहे आणि आजपर्यंत कोणतीही गोष्ट बाहेर आली नाही, तपास सुरु आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेची नाहक बदनामी झाली त्याची भरपाई कोण देणार?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार? असा सवालही शिवसेना मंत्री अनिल परब यांनी विचारत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.