Divya Pahuja Murder Case ( Marathi News ) : मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात 10 दिवसांनंतर पोलिसांना यश मिळालं असून दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बलराज गिल असं आरोपीचं नाव असून काल सायंकाळी पश्चिम बंगालमधून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बलराज गिल यानेच अन्य एक आरोपी रवी बांद्रा याच्या साथीने दिव्या पाहुजा हिचा मृतदेह कारमधून नेत नदीत फेकून दिला होता, असं सांगितलं जात आहे.
हत्येनंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. मात्र आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत होतं. काल सायंकाळी दुसऱ्या शहरात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या बलराज गिल याला पोलिसांनी कोलकाता विमानतळावरून अटक केली. गिल याची सध्या चौकशी सुरू असून त्याच्याकडून या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरा आरोपी रवी बांद्रा हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
कशी झाली दिव्याची हत्या?
गुरुग्राम शहरातील बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा हिची गँगस्टर संदीप गडोलीसोबत मैत्री होती. दिव्याने बी.कॉममध्ये शिकण्यासाठी प्रवेशही घेतला होता आणि याच दरम्यान तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. दिव्याचे वडील दिव्यांग असून ते भाजीपाला आणि फळे विकण्याचं काम करतात. दिव्याच्या कुटुंबात एक लहान बहीण आणि आई-वडील आहेत. दिव्या 18 वर्षांची असताना तिला 2016 मध्ये एका गँगस्टरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2023 मध्ये ती सात वर्षांनी तुरुंगातून बाहेर आली. गँगस्टरच्या हत्येप्रकरणी दिव्याच्या आईलाही अटक करण्यात आली होती.
दिव्या पाहुजा हिची आरोपी हॉटेल मालक अभिजीत सिंहसोबत मैत्री होती. 2 जानेवारी रोजी आरोपी अभिजीत सिंह दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंटमध्ये आला होता. दिव्याच्या फोनमधून त्याचे अश्लील फोटो डिलीट करायचे होते, मात्र दिव्याने त्याला फोनचा पासवर्ड सांगितला नाही. यावेळी संतापलेल्या अभिजीतने दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर हॉटेलमध्ये साफसफाई आणि रिसेप्शनचे काम करणारे हेमराज आणि ओमप्रकाश यांच्यासह मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवण्यात आला. यानंतर आरोपी अभिजीतने त्याच्या इतर दोन साथीदारांना बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कार दिली.