देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या एका शाखेतून तब्बल ११ कोटी रुपयांची नाणी गायब झाली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाणी गायब झाल्याने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी याची माहिती दिली.
एसबीआच्या राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एसबीआयने न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतू प्रकरणाची व्याप्ती पाहता बँकेने सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली होती.
रुपया, दोन रुपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. एसबीआयच्या शाखेत जमा रकमेमध्ये अफरातफर झाल्याचा संशय आल्याने या नाण्यांची मोजणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हळू हळू हा आकडा एक, दोन कोटींवरून थेट अकरा कोटींवर गेल्याने मोजणी करण्यासाठी आलेले बँकेचे अधिकारी देखील हादरले होते.
बँकेमध्ये १३ कोटी रुपयांची नाणी होती. या नाण्यांची मोजणी करण्यासाठी बँकेने आपल्या अधिकाऱ्यांसह जयपूरच्या एका व्हेंडरची मदत घेतली. या मोजणीमध्ये शाखेतून ११ कोटी रुपयांची नाणीच गायब असल्याचे समोर आले. सुमारे दोन कोटी रुपये असलेल्या केवळ 3,000 नाण्यांच्या पिशव्यांचा हिशेब लागला. कारण ही नाणी आरबीआयकडे जमा करण्यात आली होती. हा प्रकार ऑगस्ट २०२१ मध्ये उघडकीस आला होता. वेंडरच्या कर्मचाऱ्यांना नाण्यांची मोजणी करू नये यासाठी धमकाविण्यातही आले होते.