पटणा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शकील अहमद खान यांचा मुलगा अयानं सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. अयान याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप पुढे आले नाही. अयानच्या अचानक मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अयानचं वय २० वर्ष होते.
या घटनेची माहिती अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी म्हटलं की, ही अतिशय दु:खद घटना आहे. बिहारमधील काँग्रेस आमदार माझे मित्र शकील अहमद खान यांच्या मुलाचं आकस्मित निधन झालं आहे. माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत. त्याच्या आई वडिलांचं दु:ख शब्दात मांडू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, आमदार शकील अहमद खान यांच्या सरकारी निवासस्थानी ही घटना घडली. रात्री मुलगा एकटा खोलीत झोपला होता. सकाळ झाल्यानंतरही तो बाहेर आला नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांनी खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. अयान शकील अहमद खानचा एकलुता एक मुलगा होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलातील बडे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.
शकील अहमद खान कोण आहेत?
शकील अहमद खान हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. दिल्लीच्या जेएनयूमधून त्यांनी एमए, एमफिल आणि पीएचडी पदवी घेतली आहे. शिक्षण संपल्यानंतर १९९९ साली ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. शकील अहमद खान यांनी कटिहारच्या कदवा विधानसभा मतदारसंघातून २०१५ साली पहिल्यांदा निवडणूक लढली आणि जिंकून आमदार बनले. २०२० च्या निवडणुकीतही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. त्यानंतर बिहारमध्ये त्यांना काँग्रेस पक्षाचं विधिमंडळ नेते बनवण्यात आले.