हाजीपूर: बिहारच्या हाजीपूरमध्ये पोलिसांनी एका चोरीचा पदार्फाश केला आहे. चोरट्यांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीस चक्रावले. एका दागिन्यांच्या दुकानातून चोरट्यांनी कोट्यवधींचे दागिने लांबवले. दागिने घेऊन चोरटे फरार झाले. त्यांनी दागिने लपवले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दागिने लपवलेली जागा दाखवली. ती पाहून पोलिसांना धक्काच बसला.
२३ ऑक्टोबरला हाजीपूरमधील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दीड कोटीहून अधिक रुपयाचे दागिने लांबवले. पोलिसांनी तपास हाती घेतला. तिघांना अटक झाली. या तिघांविरोधात बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दागिने पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरट्यांनी शक्कल लढवली. त्यांनी दागिने जमिनीत पुरले आणि त्यावर काँक्रिट टाकलं.
दागिने लपवण्यासाठी चोरट्यांनी क्लृप्ती वापरली. मात्र याचा कोणताही उपयोग झाला नाही. पोलिसांनी तिघांना हिसका दाखवताच त्यांनी तोंड उघडलं आणि जमिनीखाली असलेल्या दागिन्यांची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी क्राँक्रिट उखडलं. जमीन खणली आणि पोलिसांना ३ किलोचे दागिने सापडले. मुख्य आरोपी संजय पासवानच्या घरातून सर्वाधिक दागिने जप्त झाले. त्यानं ४ ते ५ फूट खोल खड्डा खणून त्यात दागिने लपवले होते.