बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका नवऱ्याने घरच्यांसोबत मिळून गरोदार बायकोची क्रूर हत्या केली आहे. हत्येनंतर पत्नीची ओळख मिटवण्यासाठी तिचा मृतदेह जाळून शरीराचे छोटे छोटे तुकडे जमिनीत पुरले. स्थानिक गावकऱ्यांची याची माहिती दिल्यानंतर पत्नीच्या माहेरची माणसं गावात पोहचली. त्यांनी जमीन खोदल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील नोनिया बिगहा येथील ही घटना आहे. पटणा जिल्ह्यातील बिहटा येथील रहिवासी अरविंद कुमार यांनी त्यांची मुलगी काजलचं लग्न नोनिया बिगहा येथील संजीत कुमारशी केलं होतं. मागील वर्षी हे लग्न झालं होतं. संजीत कुमार हा रेल्वेत नोकरीला आहे. लग्नाच्या काही महिने सर्वकाही सुरळीत सुरू होतं. त्यानंतर नवऱ्याचं प्रमोशन झालं तेव्हा त्याने काजलकडून ६ लाख रुपयांची मागणी केली. मागील बुधवारी संजीतनं त्याची पत्नी काजलला मारहाण करुन तिची हत्या केली. इतकचं नाही तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जमिनीत पुरले. काजल ही ६ महिन्याची गरोदर असल्याचं पोलिसांनी सांगितले.
सासरची मंडळी फरार
घटनेची माहिती मिळताच काजलचे वडील अरविंद कुमार तिच्या सासरी पोहचले तेव्हा जावयाच्या घरात कुणीही नव्हते सगळे फरार झाले. मयताच्या वडिलांनी गावकऱ्यांच्या मदतीने जमीन खोदली तेव्हा मुलीच्या मृतदेहाचे तुकडे त्यांना सापडले. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला.
आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचा शोध
मृत काजलचे वडील अरविंद कुमार यांनी जावई संजीत कुमारसह ७ जणांना हुंडाबळी घेतल्याची तक्रार दिली आहे. आरोपीनं काजलला ६ लाखांची मागणी केली होती. ती पूर्ण न केल्यानं आरोपी आणि त्याच्या घरच्यांनी काजलचा जीव घेतला असा आरोप वडिलांनी केला आहे. सध्या पोलीस आरोपींच्या अटकेसाठी विविध ठिकाणी धाड टाकत आहेत.
घटनास्थळी सापडली जळालेली खाट
मृत काजलच्या भाऊ बंटी कुमारनं सांगितले की, ग्रामस्थांच्या सांगण्यावरून गावाबाहेर असलेल्या जमिनीत खोदकाम केले. तेव्हा काजलच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले. हत्येनंतर मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी आधी तिला जाळलं त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून जमिनीत पुरले. घटनास्थळी जळालेली खाट आढळली आणि आजूबाजूची काही झाडंही जळालेल्या अवस्थेत होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.