नवादा - बिहारच्या नवादा जिल्ह्यात हिसुआ पोलीस ठाण्यात एक ८ वर्षीय मुलगी रडत रडत पोहचली तेव्हा तिथे उपस्थित असणारे सर्वच पोलीस हैराण झाले. ही मुलगी पोलीस स्टेशनमध्ये येताच अधिकारी कुठे आहेत असा प्रश्न करत राहिली. आईला न्याय मिळावा यासाठी ही मुलगी पोलिसांकडे मदतीची याचना करत होती. माझ्या आईला वाचवा असं ती वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना म्हणत होती.
या मुलीची व्यथा ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. हिसुआ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनवा गावात एका महिलेला तिचा दीर आणि सासू-सासरे घरगुती वादातून मारहाण करत होते. या घटनेत ती महिला जखमी झाली. आईला घरातील सर्वजण मारताना बघून ८ वर्षीय आराध्या कुमारी घाबरली होती. ही घटना पाहताच ती ५ किमी पायपीट करत थेट पोलीस स्टेशनला पोहचली. पोलीस ठाण्यात पोहचून तिने अधिकारी कोण आहेत अशी विचारणा केली? कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवताच ती मुलगी बेधडक त्यांच्याजवळ गेली आणि रडत रडत माझ्या आईला वाचवा असं म्हणत त्यांना संपूर्ण घटना सांगितली. मुलीचे हे कृत्य पाहून ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अवाक् झाले. या मुलीने अधिकाऱ्याला म्हटलं की, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला छोटे पापा, दादा आणि दादी खूप मारत आहेत. तिला घरातून बाहेर हाकललं. माझी आई कुठे गेली मला माहिती नाही. माझे पप्पा दिल्लीत काम करतात आणि आई आता कुठे गेली माहिती नाही असं तिने रडत सांगितले.
या मुलीची तक्रार ऐकल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आसपासच्या लोकांकडूनही सत्यता पडताळून घेतली. घरातून निघालेल्या महिलेचा शोध घेत थेट मुलीसह घरी धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दिर, सासू-सासरे यांच्यावर कारवाई केली. पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. मुलं देवाघरची फुले असतात. तिने जे काही पाहिले त्याआधारे पोलिसांनी कार्यवाही केली. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करणार असल्याचं म्हणाले.