लखीसराय: बिहारमध्ये 'पकडौआ विवाहा'चा आणखी एक प्रकार समोर आला आहे. लखीसराय जिल्ह्यातल्या बहडिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या गंगासराय गावाजवळ कारमधून आलेल्या काही जणांनी एका तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याचं लग्न लावण्यात आलं. हा घटनेची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी पाटणा-लखीसराय मुख्य मार्ग रोखून धरत तरुणाची सुखरुप सुटका करण्याची मागणी केली.लखीसरायमध्ये सकाळच्या सुमारास लग्न लावण्याच्या हेतूनं तरुणाचं अपहरण करण्यात आलं. बहडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गंगासराय गावात हा प्रकार घडला. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव शिवम कुमार आहे. शिवमची लष्करात निवड झाली आहे. थोड्याच दिवसात तो लष्करात भरती होणार होता. सकाळी तो त्याच्या तीन मित्रांसोबत नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेला होता. त्यावेळी आधीपासूनच मैदानात असलेल्या पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्याचं अपहरण केलं.शिवमचं अपहरण झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना दिली. शिवमच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गंगासराय गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८० रोखून धरला. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. तरुणाच्या अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रं फिरवली. पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच संपूर्ण घटना प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी रस्ता रोखून धरल्याचं समजताच शिवमनं कुटुंबीयांशी संवाद साधला. माझं अपहरण झालेलं नसून मी सुखरुप असल्याची माहिती त्यानं कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रस्ता मोकळा केला.
लष्करात भरती होण्याआधी तरुणाचं अपहरण; जॉगिंग करताना पळवून नेऊन लावलं लग्न
By कुणाल गवाणकर | Published: January 07, 2021 4:12 PM