नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मुलीची छेड काढल्याची तक्रार करणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची हाथरसमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हाथरसची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारच्या पाटणामध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा शहरातील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मुलीची गुंडापासून सुटका करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. फतुहा हद्दीतील जग्गू बिगहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातील तरुणांनीच ही हत्या केली असून घराच्या दारात उभ्या असलेल्या महिलेवर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी महिलेला तात्काळ फतुहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. मृत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तीन मुली आहेत. गावातील काही तरुण मुलींची छेड काढत होते. त्यांची आई या तरुणांना विरोध करत होती. यावरून वाद झाला आणि तरुणांनी तिची हत्या केली. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विकृतीचा कळस! 22 वर्षीय तरुणीला डांबून ठेवलं, तब्बल 8 महिने केला बलात्कार, नंतर विकलं अन्...
पंजाबच्या बरनालामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीला तब्बल आठ महिने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी पीडितेने नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा नेत्याचाही समावेश असल्याची माहिती आता मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कोर्टात तिचा जबाब नोंदवण्यात आला. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी धमकावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.