छपरा/पटना : वाळू उत्खननातून एका पोलीस अधिकाऱ्याला एवढा पैसा मिळत होता की त्याने गेल्या अडीज वर्षांपासून पगाराला हातही लावला नव्हता. वरच्या पैशांतूनच तो आलिशान घर, गाड्या, घड्याळे अशी चैनीचे आयुष्य जगत होता. बिहारच्या कोईलवर (भोजपूर) आणि डोरीगंड (सारण) पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घबाड सापडले आहे.
हा भाग अवैध वाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध आहे. सोन नदीचा पूल पार केला की ही वाळू सोने बनते. ही वाळू महाग बनविण्यासाठी संजय प्रसाद सारख्या पोलिस अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असते. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्या प्रकरणी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने संजय प्रसादच्या दोन ठिकाणांवर छापा मारला. त्याच्याकडे 2.30 लाख रुपये रोख आणि अन्य संपत्तींची माहिती मिळाली.
तपासाच गुन्हे शाखेला जे दिसले ते पाहून त्यांचेही डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मे 2015 ते ऑक्टोबर 2017 या काळात संजय प्रसादने पगाराचा एकही रुपया बँकेतून काढला नव्हता. या पोलीस अधिकाऱ्याकडे उत्पन्नापेक्षा 25 लाख अधिक संपत्ती सापडली. त्याची चौकशी केली असता वाळूच्या धंद्यात दलालांसोबत त्याचे संबंध समोर आले आहेत. त्याच्याविरोधात 25 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय प्रसाद हा 2009 च्या बॅचचा अधिकारी आहे. मुझफ्फरपूर, सीतामढी आणि सारण जिल्ह्यात त्याची तैनाती होती. तेव्हापासून आता पर्यंत त्याला पगाराचे 60 लाख रुपये मिळाले होते. तसेच त्याने स्थानिकांच्या मदतीने काही पैसे आपल्या खात्यात वळते केले होते. संजय प्रसादने 1725 वर्गफुटाची जमिनदेखील पत्नीच्यानावे मुझफ्फरपूरमध्ये खरेदी केली होती. त्यासाठी त्याने 30 लाख रुपये दिले होते. त्याची 49 लाखांची संपत्ती सापडली आहे.