नवी दिल्ली - देशात अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये आरोपींची दहशत पाहायला मिळत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पोलिसांची एक टीम आरोपीला अटक करण्यासाठी गावामध्ये आली होती. पोलिसांच्या टीमला पाहताच आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.
आरोपींनी पोलिसांच्या टीमवर गोळीबार देखील केला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक लोकांना ताब्यात घेतलं आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महुआ एसडीपीओ पूनम केसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलिसांची एक टीम छापेमारीसाठी गेली होती. अंधाराचा फायदा घेत आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर तलवारीने देखील हल्ला केला.
पोलिसांवर आरोपींनी गोळीबार देखील केला. परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने एक्स्ट्रा फोर्स बोलवण्यात आलं. ज्यानंतर जवळपास 12 ते 13 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हल्ल्यामध्ये अनेक अधिकारी जखमी झाले असून सरकारी संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक हैराण करणारी घटना घडली आहे. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे.
रायपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. आपले कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्या अचानक गायब झाल्या होत्या. मात्र आता उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये फुलांची विक्री करताना दिसून आल्या आहेत. महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस वृंदावनमध्ये फुल विकत असल्याची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांची एक टीम त्यांना घेण्यासाठी आली. मात्र अंजना यांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेले अनेक महिने पोलीस अंजना यांचा शोध घेत होते. मात्र त्या सापडतच नव्हत्या. त्यांच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर शोध सुरू होता. पण अंजना यांनी मोबाईलचा वापर करणं बंद केल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.