बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसमोर शिक्षकांनी हात जोडून "सर, आमचा जीव वाचवा, कुठेही बदली करा, कुठेही काम करायला तयार आहोत" असं म्हटलं आहे. कुख्यात गुन्हेगार राजेश यादव हा आपल्याला मारणार असल्याचं देखील सांगितलं. राजेश यादव आणि त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या शिक्षकांवर हल्ला केला, लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण केली.
मारहाणीत सात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना जमुई जिल्ह्यातील सिमुलतला पोलीस स्टेशन अंतर्गत हायस्कूलमध्ये घडली आहे. २२ ऑक्टोबर रोजी, दिवसाढवळ्या, राजेश यादव त्याच्या अनेक सशस्त्र साथीदारांसह बोलेरो आणि तीन बाईकवर बसतपूर शाळेत पोहोचला होता.
दोन लाखांच्या खंडणीची रक्कम न दिल्याने त्याने कर्तव्यावर असलेल्या मुख्याध्यापकासह सात शिक्षकांचा पाठलाग करून त्यांना लाठा-काठ्यांनी व धारदार शस्त्रांनी मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार सरकारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. एस. सिद्धार्थ बसतपूरच्या शाळेत पोहोचले होते.
पीडित शिक्षकांनी तिथे हात जोडून अपर मुख्य सचिवांना आवाहन केलं, त्यांचा जीव वाचवा, त्यांची कुठेही बदली करा, कुठेही काम करायला तयार आहोत असं म्हटलं. तसेच राजेश यादवने खूप मारहाण केली, तलवारीने देखील मारलं. पण सुदैवाने जीव वाचला असं म्हटलं आहे.
शिक्षकांचं म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य सचिवांनी शिक्षकांसोबत पुन्हा असं काहीही होणार नाही आणि दोषीला सोडलं जाणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, मुख्य सचिवांच्या आश्वासनानंतरही शाळेला कुलूपच लागलेलं दिसत आहे. राजेश यादवच्या भीतीने एकही शिक्षक शाळेत पोहोचला नाही. त्यामुळे विद्यार्थीही घरी परतले.