Bihar Crime News : बिहारमध्ये पकडौआ विवाहाची प्रथा अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाही. अधूनमधून तरूणांना पकडून त्यांचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आल्याच्या घटना सतत समोर येत असतात. आता बेगूसराय जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे प्राण्यांच्या डॉक्टरला पकडून त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. कुटुंबियांनी सांगितलं की, प्राण्यांच्या उपाचारासाठी घरातून निघालेल्या डॉक्टर मुलाला रस्त्यातील लोकांना पकडून नेलं आणि मग त्याचं जबरदस्ती लग्न लावून दिलं. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
पीडित परिवाराच्या एका व्यक्तीने सांगितलं की, दुपारी 12 वाजता एका आजारी पशुच्या उपचारासाठी डॉक्टरला बोलण्यात आलं होतं. डॉक्टर जेव्हा पशुवर उपचार करण्यासाठी घरातून निघाला तेव्हा रस्त्यात तीन लोकांनी त्याचं अपहरण केलं. मुलाचं लग्न लावून दिल्याचं समजल्यावर कुटुंबिय हैराण झाले आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
बेगूसरायचे पोलीस अधिक्षक योगेंद्र कुमार म्हणाले की, डॉक्टरच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार दिली. आम्ही अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
पकडौआ विवाहाची ही घटना जिल्ह्यातील तेघडा पोलीस स्टेशनच्या पिढौली गावातील आहे. डॉक्टर सत्यम कुमारचे वडील सुबोध कुमार झा म्हणाले की, हसनपूर गावातील विजय सिंह यांनी त्यांच्या मुलाला बोलवलं होतं. सुबोधचा आरोप आहे की, विजयने सत्यमचं अपहरण केलं आणि एका महिलेसोबत त्याचं लग्न लावून दिलं. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. सध्या अजून कुणालाही अटक झालेली नाही.