मोतिहारी: बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात तिच्या पतीला शिक्षा झाली. तो तुरुंगात गेला. मात्र त्या महिलेच्या हत्येचं सत्य समजताच साऱ्यांनाच धक्का बसला. पोलीस आणि कुटुंबीयांना महिलेची हत्या झाल्याचं वाटत होतं. मात्र तो जिवंत असल्याचं समजताच सारेच चक्रावले. या महिलेला अटक करण्यात आली आहे.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना बिहारच्या मोतिहारीमध्ये घडली आहे. केसरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीपूर गावातील शांती देवी नावाच्या महिलेचा विवाह १४ जून २०१४ रोजी दिनेश राम यांच्यासोबत झाला. लग्नाला बरीच वर्षे उलटली. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. दोघे पंजाबच्या जालंधरमध्ये राहू लागले.
शांती देवी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. हुंड्यासाठी मुलीचा छळ सुरू होता. तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह गायब करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. केसरिया पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी न करताच दिनेश राम यांना अटक करून तुरुंगात टाकलं.
पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेल्या शैलेंद्र सिंह यांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. त्यांना संशय आल्यानं त्यांनी टेक्निकल सेलची मदत मागितली. महिलेचा फोन ट्रेस करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली. पोलीस ज्या महिलेला मृत समजत होते, ती जालंधरमध्ये असल्याचं समजलं. शांती देवी जालंधरमध्ये प्रियकरासोबत राहत होती. यानंतर पोलिसांचं एक पथक जालंधरला रवाना झालं. त्यांनी शांती देवीला अटक केली आणि सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.