उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये होळी खेळत असताना दोन ग्रुपमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीत सहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही ग्रुपमधील 10-12 जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता बसपा सुप्रीमो मायावती यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
नजीबाबादमधील मुख्तियारपूर गावामध्ये ही घटना घडली. होळीच्या दिवशी नाचण्यावरून लोकांमध्ये झालेल्या भांडणात अनेक जण जखमी झाले आहेत. या मारामारीत कोणाचं डोकं फुटलं तर कोणाला गंभीर दुखापत झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी नजीबाबादच्या मुख्तारपूर गावात होळी खेळत असताना गावातील एका घराबाहेर स्पीकर वाजत होता, त्यावर काही तरुण नाचत होते.
एक मुलगा देखील यामध्ये नाचत होता. त्यानंतर गाण्यावरून वाद झाला. दोन ग्रुपमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केला, ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. दोन्ही बाजूनेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मायावती यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. "बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबादच्या मुख्त्यारपूर गावात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची घटना गंभीर आणि हे अत्यंत दुःखद आहे. निवडणुकीचे वातावरण बिघडू नये म्हणून सरकार दोषींवर कारवाई करेल. निवडणूक आयोगानेही याची दखल घ्यावी" असं म्हटलं आहे.