शेगाव (बुलडाणा) : आधीच झालेल्या अपघातातील मृतदेह रस्त्यावर पडून असल्याचे पाहून भांबावलेल्या दुचाकीस्वाराने करकचून ब्रेक दाबले. दुचाकी घसरल्याने गाडीवर असलेली पत्नी रस्त्यावर पडून ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शेगाव-अकोट रोडवर नायरा पेट्रोलपंपासमोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजता घडली. मृत महिला व गंभीर जखमी पती अकोला जिल्ह्यातील हातरूण येथील असल्याची माहिती आहे. रस्त्यावर पडून असलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
गुरुवारी सकाळी शेगाव शहर पोलिसांनाअपघाताची माहिती मिळाली. त्यामध्ये घटनास्थळावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता एका अनोळखी पुरुषाच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो मृत झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी घटनास्थळापासून शेगावच्या दिशेने १० मीटर अंतरावर दुचाकी क्रमांक एमएच-३०, बीई-९६७ उभी होती. तसेच बाजूलाच एक महिला व एक पुरुषाच्या चपलांचे जोड पडलेले दिसले.
डोक्यावरून चाक गेल्याने मृत्यू
अनोळखी ४० वर्षीय पुरुष बुधवारी रात्री रस्त्याने पायी जाताना हा अपघात घडल्याची शक्यता आहे. त्याच्या डोक्यावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याच्या खुणा आहेत. त्याच्या अंगात कथिया रंगाचे शर्ट व भुरकट रंगाची पॅन्ट आहे. दाढी व डोक्याचे केस वाढलेले, या वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथील शवविच्छेदन कक्षात ठेवला आहे. याप्रकरणी सहायक उपनिरीक्षक गजानन इंदुरे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. - नातेवाइकांची भेट अधुरी
शेगाव येथील नातेवाईक हज यात्रा करून परतले. त्यांना भेटण्यासाठी हातरूण येथील लुकमान खान हे पत्नी तरन्नुम सहर (३८) यांच्यासह दुचाकीने शेगावकडे येत होते. लोहारा-शेगाव दरम्यान रस्त्याच्या अनोळखी मृतदेह पाहून ब्रेक लावल्याने दुचाकी घसरली. त्यावेळी पत्नी तरन्नूम रस्त्यावर पडून जागीच ठार झाली. तर पतीवर अकोला येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे नातेवाइकांची भेट अधुरी राहिली आहे.