नालासोपारा (मंगेश कराळे) :- फायनान्स कंपनी व ग्राहकांची फसवणूक करत दुचाकी विकणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून २१ लाख ४० हजारांच्या ३४ दुचाकी केल्या हस्तगत करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी हे रिकव्हरी एजंट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. अजून काही दुचाकी हस्तगत करण्यात येईल असा पोलिसांना गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
नालासोपारा येथे राहणारे संकेत विष्णु मोहिते यांनी लोन काढून दुचाकी विकत घेतली होती. २२ डिसेंबरला ते त्यांचे दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी पॉल नाडर यांनी दुचाकीच्या लोनचे हप्ते प्रलंबित असल्याचे कारण सांगितले. तसेच ही दुचाकी एल अँड टी त्या फायनान्स कंपनीमध्ये जमा करावयाची आहे असे सांगितले. आरोपीने ती दुचाकी कंपनीमध्ये जमा न करता ती परस्पर विक्री करून त्यांचे दुचाकीचा अपहार करून फसवणूक केली होती. १४ एप्रिलला नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमनेही गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला.
सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी पॉल मुर्गन अनबल्ल्गन नाडर, सलमान हनीफ शेख आणि सुधांशु ममुराली कनोजिया यांना १६ एप्रिलला ताब्यात घेतले. आरोपींनी आपसात संगणमत करुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीत यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी अशाच प्रकारच्या अनेक दुचाकी परस्पर विक्री केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने आरोपींनी परस्पर अपहार केलेल्या व विक्री केलेल्या २१ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या एकुण ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
१) ज्या नागरिकांनी लोनच्या माध्यमातून दुचाकी विकत घेतल्या आहेत त्यांनी हप्ते न भरल्यावर रिकव्हरी एजंट येतात त्यावेळी वाहने जप्त करत असल्यास सरेंडर फॉर्म पोलीस ठाण्यात जमा करून काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून होणारी फसवणूक टाळता येईल. - सुहास बावचे
(पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)