यवतमाळ : जिल्ह्यातील यवतमाळ-नांदेड मार्गावर पर्यटन विकास केला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीयपर्यटन मंत्रालयाकडून गुंतवणूक स्वीकारली जात आहे, अशी बतावणी करून एका ठगाने युवकांना गंडा घातला. वाहन खरेदीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये गोळा केले. हा प्रकार यवतमाळातील युवकाने पुराव्यानिशी उघड करून थेट केंद्रीय पर्यटन मंत्रालयात दिल्ली यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून औरंगाबाद विभागीय पर्यटक सूचना अधिकारी यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अनिरुद्धा होशिंग (५५, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), तुषार सूर्यवंशी (३०, रा. माहूर, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. यवतमाळातील कोल्हे ले-आउटमध्ये राहणाऱ्या पंकज गौतम या युवकाला अनिरुद्धा होशिंग याने फोन करून पर्यटन मंत्रालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच पर्यटनासाठी यवतमाळ-नांदेड परिसरात योजना राबविली जात आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो, पर्यटनासाठी इनोव्हा कार खरेदी केली जात आहे. त्याकरिता पाच वर्षांचा करार करून पाच लाखांची गुंतवणूक करावयाची असल्याचे सांगितले. ही रक्कम माहूर येथील आयडीएफसी बँकेत तुषार सूर्यवंशी व त्याचे पाच मित्र यांच्या खात्यात ट्रान्सफर करावयास सांगितली.
पंकज गौतम यांना संशय आल्याने त्यांनी होशिंग याचा कॉल रेकॉर्ड केला. तसेच त्याच्यासोबत ई-मेलवरून झालेला संवादही होताच या पुराव्यानिशी पंकज गौतम यांनी थेट पर्यटन मंत्रालयाचे मुंबई येथील सहायक निदेशक जितेंद्र जाधव यांच्याकडे तक्रार केली. त्याची शहानिशा केल्यानंतर विभागीय पर्यटन सूचना अधिकारी मनीष हसन तडवी औरंगाबाद यांनी यवतमाळ गाठून अवधूतवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी कलम ४१९, ४२०, ३४ भादंविनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थेट पंतप्रधानांशी संबंध असल्याचा बनाव
होशिंग याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रधान सचिव, राष्ट्रीय सचिव अजित डोवाल यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगून अनेकांना गंडविले.
नांदेड जिल्ह्यातही केली फसवणूक
नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर येथील अनेकांना पर्यटन मंत्रालयाच्या योजनेत गुंतवणुकीच्या नावाखाली जवळपास २५ लाखांनी गंडा घातला आहे. आरोपीने भारत सरकार व सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. पोलीस तपासात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.