नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर लाॅरेन्स बिष्णोई हा प्रख्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या कटाचा सूत्रधार असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. मात्र, लॉरेन्सने मुसेवाला यांच्या हत्येमध्ये आपला हात असल्याचा इन्कार केला होता. माझ्या टोळीतील साथीदारांनी हा कट रचून अमलात आणला होता,असे त्याने पोलिसांना सांगितले होते.
विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच. एस. धालिवाल यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. मुसेवालाच्या हत्येतील प्रमुख हल्लेखोरांचा विश्वासू साथीदार असलेल्या सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याला अटक केली आहे. या हल्ल्यातील पाच संशयित आरोपींची ओळख पटविण्यात आल्याचेही धालिवाल म्हणाले.
लॉरेन्स बिष्णोई हा सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. मुसेवाला यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी लॉरेन्सची वारंवार चौकशी केली. मात्र,त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मनसा जिल्ह्यात २९ मे रोजी काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्या आदल्या दिवशीच पंजाब सरकारने मुसेवालाच्या सुरक्षेत कपात केली होती. १९ गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर मुसेवाला १५ मिनिटांतच मरण पावला होता.
‘न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही’माझ्या मुलाची हत्या कोणत्या कारणासाठी केली, हेच कळेनासे झाले आहे. सिद्धूच्या हत्येसंदर्भात न्याय मिळेपर्यंत आम्ही कुटुंबीय स्वस्थ बसणार नाही, असे मुसेवालाचे वडील म्हणाले.
सौरभ महाकाल याला पुण्यातून अटकपुणे : मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात संशयित संतोष जाधव याचा साथीदार महाकाल ऊर्फ सौरभ ऊर्फ सिद्धेश हिरामण कांबळे (वय १९, रा. नारायणगाव) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंचर येथील ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले खून व मोक्का प्रकरणात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सीसीटीव्हीच्या फुटेजवरून शार्प शूटर संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची छायाचित्रे प्रसिद्धीला दिल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, महाकाल कांबळे हा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य संशयित संतोष जाधव याच्या संपर्कात होता. संतोष जाधव याच्याबरोबर महाकाल याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या राज्यांत प्रवास केला होता, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. राण्या बाणखेले याच्या खुनातील फरारी संतोष जाधव याला आश्रय दिल्याने महाकाल याला या खुनात अटक केली आहे. त्याचा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सहभाग आहे का, याचा तपास पोलीस कोठडीदरम्यान करण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.