अमरावती : सहायक पोलीस निरिक्षकाला चावा घेऊन पोलीस पथकाशी फाईट करण्यात आली. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. मोर्शी तालुक्यातील येरला येथे १३ मे रोजी सायंकाळी ६.१० ते ६.५० दरम्यान तो थरार घडला. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी (३७) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी अनंत साहेबराव पांडे, साहेबराव पांडे व दोन महिला (सर्व रा. येरला) यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकाला मारहाण तथा शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. १३ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास बैरागी यांच्या तक्रारीवरून एफआयआर करण्यात आला.
वर्धा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांच्याकडे आहे. त्या गुन्ह्यातील तपासादरम्यान संशयित आरोपी म्हणून अनंत पांडे याचे नाव आले. त्यामुळे त्याला तपासकामी ताब्यात घेण्यासाठी गणेश बैरागी व त्यांच्या पथकातील अन्य अंमलदार १३ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास येरला गाठले. त्याबाबत मोर्शी पोलिसांनादेखील पूर्वसूचना देण्यात आली. बैैरागी व मोर्शी पोलिसांना आरोपी अनंत पांडे हा घरी मिळून आला. त्यावर बैरागी यांनी त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती दिली तथा आमच्यासोबत चल, अशी सूचना केली. मात्र, पोलिसांसोबत न जाता अनंत पांडे याने बैरागी यांना शिविगाळ केली तथा त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला, तर त्याच्यासह साहेबराव पांडे याने पोलीस पथकाशी धक्काबुक्की केली. अखेर वर्धा पोलिसांनी अनंत पांडे याला अटक केली. ते त्याला वर्धा येथे घेऊन गेले.
एपीआयने नोंदविली तक्रार
वर्धा जाण्यापुर्वी एपीआय गणेश बैरागी यांनी मोर्शी पोलीस ठाणे गाठून येरला येथील घटनेबाबत तक्रार नोंदविली. शासकीय कर्तव्य करीत असताना आरोपींनी हल्ला करून जखमी केले तथा अश्लील शिविगाळ केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
आरोपीला तपासकामी ताब्यात घेत असताना पोलीस पथकाशी धक्काबुक्की करण्यात आली. एपीआयला चावा घेण्यात आला. मुख्य आरोपीला घेऊन वर्धा पोलीस रवाना झाले.
- श्रीराम लांबाडे, ठाणेदार, मोर्शी