हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगीला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला फरिदाबाद येथून अटक केली. या अटकेसाठी पोलिसांना मोठी धावपळ करावी लागली आहे. या अटकेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अगदी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचे दिसत आहे.
फिल्मी स्टाईलमध्ये धरपकड -नूहची सीआयए टीम साध्या पोशाखात शस्त्र सज्ज तीन वाहनांतून फरिदाबाद येथील बिट्टूच्या घरी पोहोचली. यावेळी टीमला बघताच बिट्टू बजरंगीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसही त्याच्या मागे धावू लागले. फरिदाबादच्या ज्या गल्लीत हा संपूर्ण ड्रामा घडला, तेथे पोलिसांच्या रेड दरम्यान धावपळ उडाली होती. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर बिट्टू पोलिसांच्या हाती सापडला. पोलीस बिट्टूला पकडल्यानंतर घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.
सरकारी कामात अडथळा - महत्वाचे म्हणजे, बिट्टू बजरंगी आणि त्याच्या 15 ते 20 इतर लोकांविरोधात नूह येथील पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्र कायदा आणि आयपीसीच्या कलम 148/149/332/353/186/395/397/506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टू बजरंगी आणि इतर 15 ते 20 लोकांनी नूहमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर तलवार आदी शस्त्रांसह घोषणाबाजी केली होती. त्याला पोलिसांनी समजावले होते. मात्र त्याने सरकारी कामात अडथळा आणला.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -हरियाणातील नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रेची घोषणा केली होती. यासाठी प्रशासनाकडून परवानगीही घेण्यात आली होती. मात्र ब्रिजमंडल यात्रेत दगडफेक करण्यात आली. यानंतर काही वेळातच याचे रुपांतर दोन समुदायांतील हिंसाचारात झाले. येथील वातावरण एवढे तापले होते की, शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलीस ठाण्यावरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. पोलिसांवरही हल्ले झाले. एवोडेच नाही, तर नुहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. हा हिंसाचार आगदी फरीदाबाद आणि गुरुग्रामपर्यंत पसरला होता.