केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपमधील नाट्य जोरदार गाजलं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या घटनाक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांची अटक आणि सुटका एकाच दिवशी झाली. त्यानंतर सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी राणेँविषयी अपशब्द आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरेंविरोधात नाशकात तक्रार दाखल केली आहे.
भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्या. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. तिसरी तक्रार शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरेंविरोधात दाखल केली असून यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधील शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचंही नाव आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये बुधवारी (२५ ऑगस्ट) राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द म्हणजे राणेंना संविधानानुसार देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री पदाचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. तसेच बोरस्ते यांनी या लेखाचे पोस्टर बनवून ते जागोजागी लावून बदनामी केल्याप्रकरणी रश्मी ठाकरे आणि बोरस्तेंविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.