पनवेल - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असताना मित्रमंडळींसह पार्टी करणे भाजप नगरसेवकाला महागात पडले आहे. पनवेलमधील नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसनिमित्ताने जमलेल्या 11 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर ११ जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तातडीने नगरसेवक बहिरा व अन्य जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत.
काही दिवसांपूर्वी नगरसेवक बहिरा यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परिसरात भाजपतर्फे मास्क वाटप केले होते. तसेच, खारघरमध्ये शुक्रवारी एका ३३ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरलेली असताना नगरसेवकाने वाढदिवस साजरा केला. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पोलिसांचे पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.