भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:01 PM2022-02-27T20:01:02+5:302022-02-27T21:01:16+5:30

Crime News : नागपुरात कार्यालयाची तोडफोड, भाजपा-काँग्रेसमध्ये जोरदार राडा

BJP Corporator Vicky Kukreja has also been charged with atrocity and molestation | भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल

भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल

googlenewsNext

नागपूर : प्रभागातील समस्याचे निवेदन देण्यासाठी भाजप नगरसेवक विकी ऊर्फ वीरेंद्र कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेलेल्या महिला आणि इतरांसोबत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. कुकरेजा यांच्या कार्यालयात दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी नगरसेवक कुकरेजा यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यासोबतच विरोधकांनी त्यांचे कपडेही फाडले. तर, कुकरेजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांशी लज्जास्पद वर्तन करून त्यांना मारहाण करण्यासोबतच त्यांचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे उत्तर नागपुरात आज दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रभागातील काही महिला आणि काँग्रेसचे नेते बाबू खान रविवारी सकाळी १०.३० वाजता नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात गेले. कार्यालयातील कार्यकर्त्यांनी कुकरेजा यांना फोनवरून माहिती देऊन बाजूलाच कार्यक्रमात असलेल्या कुकरेजा यांना बोलवून घेतले. वाघमारे आणि अन्य महिलांनी त्यांना कार्यालयात महिलांसोबत बाबू खान दिसल्याने कुकरेजा भडकले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर कुकरेजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून कार्यालयातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तेथे तोडफोड सुरू केली. ते पाहून विकी कुकरेजा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना तर बाबू खान यांच्यासोबत असलेल्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेतले. भाजपा आणि काँग्रेसचेही कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तेथे जोरदार राडा झाला. एकमेकांना मारहाण करतानाच विरोधकांनी कुकरेजा यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. भाजपा तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री झाल्याने कुकरेजा आणि त्यांचे काही कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे बाबू खान आणि त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस तेथे पोहचले. दोन्ही कडचे नेते कार्यकर्ते आक्रमक मोडवर असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी दंगाविरोधी पथकासह पोलिसांचा मोठा ताफा बोलावून घेतला. कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊत, वेदप्रकाश आर्य आणि माजी नगरसेवक सुरेश जग्यासी तर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके माजी आमदार मिलिंद माने यांच्यासह जरीपटक्यातील अनेक नगरसेवक घटनास्थळी पोहचले. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण चिघळल्याचे लक्षात आल्याने अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त मनिष कलवानीया, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी सर्वांची समजूत काढत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तेथे मोठ्या संख्येत भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते पोहचले. त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी विक्की कुकरेजा आणि त्यांच्या २० ते २५ सहकाऱ्यांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रासिटी) कायद्याचे कलम ३ (१) तसेच महिलांचा विनयभंग करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. कुकरेजा यांच्या गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबू खान  आणि साथीधारांविरुद्ध खंडणी वसुली, तोडफोड करणे आणि विनयभंग करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

रस्त्यावर जाळपोळ, हुल्लडबाजी
या घटनेनंतर काही कार्यकर्त्यांनी जरीपटक्यातील काही भागात धुमाकूळ घालून टायर पेटवले. रस्त्यावर गोंधळ घातला. त्यांच्या हुल्लडबाजीमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठा धूर दिसत असल्याने एकच खळबळ उडाली. दगडफेक तसेच जाळपोळीच्या धाकाने अनेक व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांची शटर बंद केली.

Web Title: BJP Corporator Vicky Kukreja has also been charged with atrocity and molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.