मुंबई - नायर रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेला अपशब्द वापरले आणि नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी रुग्णालयातील परिचारिकांनी सकाळी काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. भायखळा येथील भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर देवीदास लोखंडे यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी केली.नायर रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर नातेवाइकांच्या भेटीस आले होते. वॉर्ड क्रमांक ११ मध्ये परिचारिकांनी त्यांची ओळख विचारली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या देवीदास लोखंडे यांनी परिचारिकेला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.काही काळ परिचारिका आणि लोखंडे यांच्यात वाद झाला, त्या वेळेस लोखंडे यांनी परिचारिकेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली. या घटनेचा निषेध म्हणून परिचारिकांनी माफीची मागणी करीत सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत कामबंद आंदोलन केले. त्यानंतर दुपारी सुरेखा लोखंडे यांनी रुग्णालयात दाखल होत परिचारिकांची माफी मागितली. या माफीनाम्यानंतर परिचारिकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
३५ परिचारिकांनी नोंदवला सहभाग
याविषयी, कामगार संघटना नेत्या त्रिशीला कांबळे यांनी सांगितले की, रात्रपाळीत एकच परिचारिका काम करते. एका वॉर्डमध्ये किमान तीन परिचारिका असणे गरजेचे आहे, मात्र अजूनही पालिका रुग्णालयात परिचारिकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, बऱ्याचदा हा लोकप्रतिनिधींचा त्रास परिचारिकांना सहन करावा लागतो, त्यामुळे रुग्णालयातील ३५० परिचारिकांनी या काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला.