बांदा – उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बहुचर्चित अमन हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. मृत अमनचे आई वडिल मुलाच्या अस्थी घेऊन अशोक घाट इथं उपोषणाला बसले आहेत. वडिलांनी रडत रडत जोवर माझ्या मुलाला न्याय मिळत नाही तोवर मी उपोषण करणार असल्याचा इशाराच प्रशासनाला दिला आहे. मग माझा जीव गेला तरी चालेल असंही हतबल वडिलांनी म्हटलं आहे.
हा हतबल वडील दुसरा तिसरा कुणी नसून राज्यातील सत्ताधारी पक्षाचा स्थानिक नेता आहे. भाजपा नेते संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, माझी पत्नी मधु त्रिपाठी ही पक्षाची सभासद आहे आणि मी सक्रीय कार्यकर्ता आहे. माझ्या मुलाची दीड महिन्यापूर्वी हत्या झाली. गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाचेच काही जण मला धमकावत नाटक करू नकोस, गप्प बस असं बोलत आहेत. परंतु मी गप्प बसणार नाही असं वडिलांनी सांगितले आहे.
राज्यात भाजपाचं सरकार आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मला न्याय मिळत नाही तर सर्वसामान्य जनतेला कसा मिळणार? उत्तर प्रदेशात लोकशाही संपली आहे. कुणालाही न्याय मिळत नाही. न्याय मिळणंही शक्य नाही. तरीही माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी मी पत्नीसोबत मिळून संघर्ष करत राहीन. भलेही आमचे प्राण जावो. या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते संजय त्रिपाठी यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील बंगालीपूरा येथील रहिवासी भाजपा कार्यकर्ता संजय त्रिपाठी यांच्या १४ वर्षीय मुलगा अमनचा मृतदेह कनवारा गावातील केन नदीकिनारी ११ ऑक्टोबरला सापडला होता. तो मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जात असल्याचं सांगत घरातून बाहेर पडला होता. १२ ऑक्टोबरला वडील संजय त्रिपाठी यांनी मुलाच्या हत्येची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. अमनचा मृत्यू पाण्यात बुडल्यानं झाल्याचं पोलिसांनी सांगितले. तर अमनच्या आईवडिलांनी मागणी करत पोलीस महानिरीक्षकांकडून अन्य जिल्ह्यातील पोलिसांकडून याचा तपास करण्यास सांगितले. यावर पोलीस महानिरीक्षकांनी हमीरपूर पोलीस गुन्हे शाखाला हा तपास सोपवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.