चेन्नई - भारतीय जनता पार्टीच्या ट्रेडर्स विंगचा नेता राहिलेल्या मरियूर रामदास गणेश आणि त्याचा भाऊ मरियूर रामदास स्वामिनाथन यांच्यावर तब्बल ६०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये या दोघांनाही हेलिकॉप्टर ब्रदर्स या नावाने ओळखले जात होते. आता त्यांचे फोटो जागोजागी लावण्यात आले आहेत. लोकांनी या दोघांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (BJP leader & his brother alleged of cheating rs 600 crore from people)
तिरुवरूर येथील मुळचे राहणारे असलेले हेलिकॉप्टर ब्रदर्स हे सहा वर्षांपूर्वी कुंभकोणममध्ये स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी डेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. या दोन्ही भावांनी व्हिक्टी फायनान्स नावाची एक वित्तीय संस्था सुरू केली होती. तसेच २०१९ मध्ये अर्जुन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका विमान कंपनीची नोंदणी केली होती. तसेच या दोघांनीही लोकांकडून पैसे दुप्पट करण्याच्या नावावर गुंतवणूक करून घेतली होती.
सुरुवातीला दोघांनीही आपले वचन प्रमाणिकपणे निभावले होते. मात्र कोरोनामुळे नंतर त्यांचे आर्थिक गणित बदलले. गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी पैसे परत मागितले तेव्हा या भावांनी ते परत लेले नाहीत. तेव्हा कंपनीत गुंतवणूक करणारे एक दाम्पत्या जफरुल्लाह आणि फैराज बानो यांनी तंजावरचे एसपी देशमुख शेखर संजय यांच्याकडे तक्रार नोंद केली.
या दाम्पत्याने दावा केला की, त्यांनी हेलिकॉप्टर ब्रदर्सची मालकी असलेल्या वित्तीय संस्थेमध्ये १५ कोटी रुपये जमा केले होते. दाम्पत्याला त्यांचे पैसे कधीच मिळाले नाहीत. तसेच हेलिकॉप्टर ब्रदर्सकडून त्यांना धमकीही देण्यात आली. दरम्यान, योजनेत दोन्ही भावांना २५ लाख रुपये देणाऱ्या गोविंदराज यांनी सांगितले की, मी मित्र आणि कुटुंबीयांकडून कर्ज घेऊन २५ लाख रुपये दिले होते.
एक अन्य गुंतवणूकदार एसीएन राजन यांनी सांगितले की, मी माझ्या मुलीचे दागिने गहाण ठेवून १० लाख आणि मित्रांकडून ४० लाख रुपये उधार घेऊन एक वर्षाच्या योजनेमध्ये ५० लाख रुपये गुंतवले होते. त्यातील व्याज तर गेलेच, पण मूळ मुद्दलही मिळाले नाही. आता माझी सरकारला विनंतरी आहे की, त्यांनी कारवाई करून पैसे परत मिळवून देण्यात आमची मदत करावी.
२०१९ मध्ये मुलाच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी मरियूर रामदास गणेश याने हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला होता. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टर ब्रदर्स या नावाने ओखळले जाऊ लागले होते. आता तंजावूर जिल्हा गुन्हे शाखेने दोन्ही भाऊ आणि अन्य दोघांविरोधात फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा ठपका ठेवत भादंवि कलम ४०६, ४२०, आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या भावांच्या कंपनीचा व्यवस्थापक समजल्या जाणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तर सध्या दोन्ही भाऊ फार आहेत. तसेच वाद वाढत असल्याचे पाहून भाजपाने गणेशला पक्षातून हटवले आहे. तंजावर (उत्तर) येथील भाजपा नेते एन. सतीश कुमार यांनी १८ जुलै रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून गणेश यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याची माहिती दिली आहे.