नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये भाजपा नेत्याची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. ग्रेटर नोएडा येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपा नेत्याच्या गैरवर्तनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राज नागर हे काही तरुणांसह शहरातील बीटा-2 पोलीस ठाण्यात दाखल झाले. ते महिला पोलिसांसमोरच शिवीगाळ करायला लागले. पोलीस कर्मचाऱ्याने विरोध केल्यावर 'इन्स्पेक्टर, तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही' असं म्हणाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हाध्यक्षकावर रोडरेजमधील आरोपी तरुणाला पोलीस ठाण्यातून नेल्याचा आरोप आहे.
जिल्हाध्यक्ष राज नागर यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आपल्या अधिकाऱ्याला बेकायदेशीर कोठडीत ठेवलं होतं असं सांगितलं. सेक्टर बीटा-2 कोतवालीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे सूरजपूर मंडल अध्यक्ष अतुल गुर्जर यांना सोडवण्यासाठी अनेक तरुणांसह राज नागर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. ते पोलीस ठाण्यात गेले आणि आपल्या मित्राला येथून सोडण्यास सांगितले. त्यावर पोलिसांनी त्यांना रोडरेज प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. या घटनेत या व्यक्तीचा सहभाग आढळला नाही तर पोलीस त्याला सोडून देतील असंही म्हटलं.
सध्या पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. यावर राज नागर यांनी संतप्त होऊन तेथे उभ्या असलेल्या महिला पोलिसांसमोरच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचार्यांचे म्हणणे आहे की भाजपा नेत्याने स्वतःची दादागिरी दाखवण्यासाठी आपल्या साथीदाराला हा व्हिडीओ काढायला सांगितला होता. राज नागर हे शिवीगाळ करत असताना त्याच्या साथीदाराने संपूर्ण व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करून जिल्ह्यात आपला धाक निर्माण केला आहे.
एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे नेतेच तोडफोड करण्यात व्यस्त आहेत असं म्हणत सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहेत. राज नागर यांचे म्हणणे आहे की, त्यांनी पोलिसांशी नाही तर पोलिसांनी आमच्याशी गैरवर्तन केले आहे. ते म्हणाले, सकाळी मला पोलीस आयुक्त आलोक सिंह यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले की ही पोलिसांची चूक आहे. त्यांच्यावर कारवाई करू. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.