नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एका भाजपा नेत्याच्या आईची आणि दीड वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. परशुराम शुक्ला असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. त्याच्या कुटुंबातील चारही सदस्यांवर फावड्याने हल्ला करण्यात आला. ज्यावेळी कुटुंबीयांवर हल्ला झाला त्यावेळी शुक्ला घरामध्ये नव्हते. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. गोरखपूरच्या हरपूर-बुदहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेनुआ गावात मंगळवारी (27 जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या परशुराम शुक्ला यांच्या घरावर सीताराम शुक्ला यांनी हल्ला केला. त्यावेळी परशुराम हे आपल्या काही कामानिमित्त लुधियाना येथे गेले होते. सीताराम आणि परशुराम यांच्यात छतावरून पाणी गळतं यावरून वाद झाला होता. याबाबत पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी पोलीस आयजीआरएस पोर्टलच्या तक्रारीनुसार तपास आणि अधिक चौकशी करण्यासाठी सीताराम शुक्लाच्या घरी आले होते. सीताराम ऑटो चालवतो. तो संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला याबाबत माहिती दिली.
सीताराम हे ऐकून खूप संतापला, रागाच्या भरात तो फावडं घेऊन परशुराम शुक्ला यांच्या घरी गेला. त्याने परशुराम यांची 70 वर्षीय आई विमला देवी आणि दीड वर्षांच्या मुलगा रौनक यांच्या डोक्यात आणि मानेवर फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. आपल्या आईला आणि सासूला वाचवण्यासाठी परशुराम यांची पत्नी सुषमा शुक्ला यांनी धाव घेतली. तेव्हा त्यांच्यावर आणि दहा वर्षीय मुलीवर फावड्याने वार केला. यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभ, मनोज अवस्थी, एके सिंह हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच गावात तणावाचं वातावरण असल्याने पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. हत्या केल्यानंतर सीताराम शुक्ला फरार झाला आहे. पोलिसांच्या काही टीम त्याचा शोध घेत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.