नवी दिल्ली - दिल्लीतील नंदनगरी परिसरातील सुंदरनगरी येथे भाजपा नेते आणि आरटीआय कार्यकर्ते झुल्फिकार कुरैशी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. झुल्फिकार हे सकाळी नमाज पढण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. नमाज पढण्यासाठी गेलेल्या झुल्फिकार यांच्यावर मशिदीच्या बाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यासोबतच हल्लेखोरांनी झुल्फिकार कुरेशी यांच्या मुलावरही हल्ला केला.दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते झुल्फिकार कुरेशी यांच्या मुलाला स्वामी दयानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यासोबतच पोलिसांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. झुल्फिकार कुरैशी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबीयांकडे चौकशी केली जात आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.