मध्य प्रदेशच्या सागरमधील जगदीश यादव हत्याकांडातील आरोपी व भाजपातून काढून टाकण्यात आलेला नेता मिश्री चंद गुप्ताचे ५ मजली हॉटेल डायनामाईटने उडवून देण्यात आले आहे. या हॉटेलची इमारत ५ सेकंदांत जमिनदोस्त झाली. उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे लोण आता मध्यप्रदेशमध्येही सुरु झाले आहे.
गुप्ताचे हॉटेल पाडण्यासाठी इंदौरहून टीम बोलविण्यात आली होती. त्यांनी १२ तासांच्या प्रयत्नांनी हे हॉटेल पाडले आहे. भाजपाचा नेता असल्याने त्याने दोन मजल्यांचा परवानगी असताना पाच मजल्यांचे हॉटेल उभे केले होते. प्रशासनही कारवाई करत नव्हते. परंतू हत्येच्या आरोपात सापडल्याने भाजपानेही त्याच्या डोक्यावरून हात काढून घेतला. यामुळे ही कारवाई झाली आहे. त्याला दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सची परवानगी देण्यात आली होती.
ही पाच मजली इमारत पाडण्यासाठी सुमारे 80 किलो दारुगोळा, 85 जिलेटिन कांड्यांच्या वापर करण्यात आला होता. दोन वेळा ब्लास्टिंग करावे लागले. एकदा दुपारी ब्लास्टिंग झाले, दुसऱ्यांदा रात्री आठच्या सुमारास, त्यानंतर काही सेकंदातच भाजपच्या बहिष्कृत नेत्याचे हॉटेल जमीनदोस्त झाले.
23 डिसेंबर रोजी भाजप नेता मिश्री चंद गुप्ता याचा भाऊ आणि पुतण्याने निवडणुकीच्या वैमनस्यातून जगदीश यादव या तरुणाचा थारने ठेचून खून केला होता. मृत तरुण जगदीश यादव हा अपक्ष नगरसेवकाचा पुतण्या होता. यानंतर भाजपने आरोपींची पक्षातून हकालपट्टी केली होती. हत्याकांड झाल्यापासून हे हॉटेल पाडण्याची मागणी होत होती. या घटनेनंतर तब्बल 12 दिवसांनी हे हॉटेल उद्ध्वस्त झाले. या प्रकरणी मक्रोनिया पोलिस स्टेशनने 8 जणांना आरोपी बनवले होते.
यातील मुख्य आरोपी लवी गुप्ता यांच्यासह हनी, लकी, अधिवक्ता चंद गुप्ता आणि आशिष मालवीय यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मिश्री चंद्र गुप्ता आणि त्यांचे दोन भाऊ धर्मेंद्र आणि जितेंद्र हे फरार आहेत.