धनबाद - झारखंड भाजपा आमदार इंद्रजीत महतो यांचा मुलगा विवेकनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली आहे. विवेकच्या नातेवाईकांची चौकशी केली जाणार असून जवळच्या मित्रांशीही संपर्क सुरु आहे. सध्या विवेकनं आत्महत्या का केली याबाबत ठोस कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धनबादच्या सिंद्री विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार इंद्रजीत महतो हे दोन वर्षांपासून आजारी आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की, रविवारच्या मध्यरात्री इंद्रजीत महतोंचा मोठा मुलगा विवेक मित्रांना भेटायला सांगून घराबाहेर पडला होता. नंतर विवेकने सल्फासच्या गोळ्या घेतल्याचे आढळून आले आणि त्याची प्रकृती खालावली होती. कुटुंबीयांनी विवेकला तात्काळ रांचीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सोमवारी सकाळी विवेकचा मृत्यू झाला.
विवेक रविवारी रात्री रांचीच्या ग्रामीण भागातील सिल्ली येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मित्राला भेटायला सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर मला सल्फा खाण्याची माहिती मिळाली. विवेकचे वडील भाजपा आमदार इंद्रजीत महतो गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजारी आहेत. २०२१ मध्ये त्यांना कोरोना झाला होता तेव्हापासून आमदारांची प्रकृती ठीक नाही. कोरोनानंतरच्या साईड इफेक्टमुळे महतो यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वडिलांच्या आजारपणामुळे विवेक तणावाखाली होताविवेकच्या मृत्यूवर भाजपा नेत्या निताई राजवार यांनी सांगितले की, विवेक त्याचे वडील इंद्रजीत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. याशिवाय तो त्याच्या अभ्यासाबाबतही तणावाखाली होता. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीत बीटेकची परीक्षा देऊन रांचीला पोहोचला होता. ही घटना कळताच भाजपा आमदार समरी लाल आणि झामुमोचे आमदार मथुरा प्रसाद महतो यांनी रांची येथील रिम्सच्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. त्याचवेळी भाजपा नेते बाबुलाल मरांडी यांनीही या घटनेचे वर्णन अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. तसेच कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.
पोलीस तपास सुरूया संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विवेकच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितले की, घटनेची माहिती घेतली जात आहे. कुटुंबीयांसह इतर परिचितांचीही चौकशी सुरू आहे. मृत्यूचे कारण लवकरच समोर येईल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.