नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीरला (Gautam Gambhir) ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आला होता. दरम्यान, गौतम गंभीरने आरोप केला होता की, त्याला 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण, ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला, त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून (Google) माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅड्रेसही सापडला आहे. विशेष म्हणजे, फक्त गौतम गंभीरच नाही तर इतरही अनेकांना दहशतवादी संघटना ISIS च्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर अनेक यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गौतम गंभीरने केला होता. याबाबत डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले होते की, गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी मंगळवारी रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधीही दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगत पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी खासदार गौतम गंभीरने शहादारा जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक यांना पत्र लिहिले होते. यात गौतम गंभीरने “मला आणि माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबबात मी तक्रार नोंदवली आहे. तरी माझी सुरक्षा वाढवण्यात यावी”, अशी मागणी केली होती.
गंभीरचे क्रिकेट करिअरगौतम गंभीरने भारतीय संघासाठी 58 कसोटी सामने, 147 एकदिवसीय सामने आणि 37 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 58 कसोटींमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4 हजार 154 धावा केल्या आहेत. तसेच, गौतम गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यात 39.68 च्या सरासरीने 5 हजार 238 धावा केल्या आहेत. तर 37 टी -20 सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. गौतम गंभीरने विश्वचषक 2011मध्ये भारतीय संघासाठी 122 चेंडूंत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 2011 वर्ल्ड कप जिंकला. मात्र गौतम गंभीरने 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.