भाजपाच्या खासदाराच्या मुलाला अमली पदार्थासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:13 PM2019-03-14T17:13:18+5:302019-03-14T17:15:14+5:30
संपतिया उइके असं या भाजप खासदाराचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या आरोपी मुलाचे नाव आहे.
मध्य प्रदेश - देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना मध्य प्रदेशमधील एका भाजपाच्या खासदाराच्या मुलाला ड्रग्ससहित अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या संबंध देशात वाहत असताना सर्व उमेदवार आपल्या प्रतिमेला धक्का बसणार नाही याची काळजी घेत आहेत. मात्र, मध्य प्रदेशमधील भाजपा खासदाराच्या मुलाला अमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असं या भाजप खासदाराचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या आरोपी मुलाचे नाव आहे.
मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी थांबवली नाही तर याउलट त्याने आपली कार भरधाव नेली. त्यावरून पोलीसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले. तेव्हा पोलिसांसमोर तिन्ही तरूण भयभीत झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यानंतर पोलीसांना कारमध्ये अमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे तिन्ही तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, खासदाराच्या मुलासह त्याच्या मित्रांना अमली पदार्थासह अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक परिहार यांनी दिली. संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आहेत. सत्येंद्रवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत.