लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे. यादरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
गजारिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारिया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.
जितेन हे एक राजकारणातील हस्तक वा प्यादे असून त्याने त्याच्या राजा व वजिराच्या भूमिकेनुसार हे ट्वीट केले असावे. कारण भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व पदाधिकाऱ्यांनी ट्वीटचे समर्थन केले आहे. भाजपमध्ये अनेकप्रकारे शिक्षण, प्रशिक्षण केले जाते. केंद्रातील अपयशावरून लक्ष उडवायला अशा खेळ्या करणे हे त्यांचे राजकारणच आहे. ज्यांना सायबर क्राईममधील सुरक्षिततेसाठी करायचे असेल, त्यांनी केंद्राच्या ६६ अ कायद्याला परिणामकारक करावे. शक्ती कायद्याच्या धर्तीवर केंद्राने सायबर क्राईमचा समावेश करावा. - नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे, अपमान करणे अशी ट्रोलरची पार्टी तयार झाली आहे. भाजप आता भारतीय ट्रोल पार्टी झाली आहे. अशा विकृत लोकांवर कठोर कारवाई करायला हवी. महिलांविषयी गरळ ओकणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर कायमची बंदी घातली पाहिजे. - मनीषा कायंदे, शिवसेना आमदार