मुंबई - राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे कोंडीत सापडलेल्या भाजपच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव अरविंद चौहानने पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी चौहानला अटक केली असून त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रोळी पोलिसांचे पथक विक्रोळीच्या 'हरियाली व्हिलेज'मधील रामभजन कंपाऊंड येथे भूखंडाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गेले असता त्यावेळी अरविंद चौहान आणि त्याच्या साथीदारांनी या सर्वेक्षणासाठी विरोध करत कामात अडचण आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता अरविंद चौहान आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत ४ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अरविंद चौहान आणि त्याच्या साथीदाराला विक्रोळी पोलिसांनी अटक केली असून त्याचे आणखी २ साथीदार फरार आहेत. याप्रकरणी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.