नागपूर – शहरातील भाजपा कार्यकर्त्या सना खान गेल्या १ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक कामानिमित्त त्या मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गेल्या होत्या. परंतु तिथून त्या माघारी परतल्या नाहीत. सना खान बेपत्ता प्रकरणी आता नागपूरच्या मानकापूर इथं पोलीस ठाण्यात तक्रार दाखर करण्यात आली आहे. सना खान या नागपूर पश्चिम मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सना खान यांचा व्यावसायिक पार्टनर साहू हा जबलपूरमध्ये राहतो. सना खान यांच्या बेपत्ता होण्यामागे प्रमुख संशयित आरोपी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. जबलपूरमध्ये साहू ढाबा चालवतो. १ ऑगस्ट रोजी कामानिमित्त जबलपूरला जात असल्याचे सांगून सना खान घराबाहेर पडल्या. परंतु त्यानंतर त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही. तसेच सना खान माघारी परतल्या नाहीत म्हणून कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत मानकापूर पोलीस निरिक्षक शुभांगी वानखेडे यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे आम्ही सना खान यांच्या बेपत्त होण्याची तक्रार दाखल केली आहे. आमची टीम जबलपूरला गेली आहे. सध्या सनाचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचलो नाही. आमचा तपास सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु इतके दिवस सना खानचा संपर्क होत नसल्याने आणि ती कुठे आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालंय का अशी कुजबूज सुरू झाली आहे.
सूत्रांनुसार, सना खान साहूच्या जबलपूर येथील घरी गेली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, २ ऑगस्टच्या सकाळी घरातून आवाज येत होता. ढाब्याचा मालक असलेला साहू जबलपूरहून त्याच्या कर्मचाऱ्यासह बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याच्या मूळगावीही भेट दिली परंतु त्याचा ठावठिकाणा लागला नाही. साहूची पत्नी जबलपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तपासात ते दोघे वेगळे राहत असल्याचे पुढे आले. या दोघांची घटस्फोट प्रक्रिया कोर्टात सुरू असल्याचे पोलिसांना कळाले. साहूने सनाची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी असा संशय पोलिसांना आहे. परंतु अद्याप या प्रकरणात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.