मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका २४ वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती किठौरचे माजी आमदार सत्यवीर त्यागी यांनी दिली. पोलीस ठाण्यातून परतत असताना तरुणाची हत्या करण्यात आली.
परिक्षितगढच्या खेडा गावात रविवारी २४ वर्षीय वैभव त्यागीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. राजकीय कारणातून आणि निवडणुकीवेळी झालेल्या वादातून हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीवेळी वैभवचा गावातील काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर वैभवनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी वैभव त्यागी घरी परतत असताना काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे माजी आमदार सत्यवीर त्यागी वैभवच्या घरी पोहोचले. वैभव भाजपचा कार्यकर्ता होता, असं त्यांनी सांगितलं. त्याच्या मारेकऱ्यांना समाजवादी पक्षाचं संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. वैभवला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचीच तक्रार करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला होता. तिथूनच परतत असताना त्याची हत्या करण्यात आली, असं सत्यवीर त्यागींनी सांगितलं.
या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक केशव कुमार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी वैभवचा गावातील तरुणांशी ऊसाच्या कापणीवरून वाद झाला होता. ग्रामपंचायतीनं हा वाद सोडवला होता. मात्र रविवारी पुन्हा भांडण झालं. त्याच भांडणातून त्याची हत्या झाल्याचं कुमार यांनी सांगितलं.