बरेली: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांनंतर सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन भाजपच्याच दुसऱ्या नेत्याच्या ताब्यात होती. बेपत्ता झालेल्या मुलीचे वडील संभलमध्ये वास्तव्यास असून मुलीचा शोध लागावा यासाठी ते मोरादाबादमधील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते.
मंगळवारी बेपत्ता मुलीचा शोध लागला. मोरादाबादमधून पोलिसांनी तिची सुटका केली. भाजपच्याच एका नेत्यानं तिला बंदीवासात ठेवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. दोन्ही भाजपचे नेते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मुलीला स्वत:च्या ताब्यात ठेवणारा विष्णू शर्मा भाजपचा बूथ अध्यक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्यानं स्वत:चा मुक्काम बदलत होता. आरोपीला अटक झाल्यानंतर बेपत्ता मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे.
आठवीत शिकणारी मुलगी जानेवारीत तिच्या आजी आजोबांच्या घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर शर्माचा ठावठिकाणादेखील सापडत नव्हता. त्यामुळे हरवलेल्या मुलीच्या वडिलांना शर्माबद्दल संशय होता. त्यांनी त्यांच्या तक्रारीत शर्माचा उल्लेख केला होता. जुलैमध्ये पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी पाच पथकं तयार केली. प्रकरणाचा तपास संभलच्या गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला.
बेपत्ता मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळून आलं. शर्मानं आपल्याला जबरदस्तीनं डांबून ठेवल्याची माहिती तिनं न्यायालयाला दिली. मुलगी मला २१ वर्षांची वाटल्यानं तिच्यासोबत लग्न केल्याचा दावा आरोपी शर्मानं केला. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३६६, ३७६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.