बंगळुरू: कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. नेट्टारू यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैया लालच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पोस्ट टाकल्यामुळे नेट्टारुंची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बेल्लारे परिसरात प्रवीण पोल्ट्रीचे दुकान चालवत असे. दिवसभर काम केल्यानंतर प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणचा मृत्यू झाला.
कन्हैयालालच्या हत्येचा निषेध29 जून रोजी प्रवीणने उदयपुरमधील टेलर कन्हैया लालच्या हत्येच्या निषेधार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या टेलरची गळा चिरुन हत्या करण्यात आली, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. त्याच समर्थनामुळे नेट्टारू यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय. काही दिवसांपूर्वी, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याबद्दल राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालालची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता.
हिंदू संघटनांनी पुकारला बंद प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रवीणच्या हत्येचे प्रकरण पीएफआय आणि एसडीपीआयशी जोडत, दक्षिण कन्नडमधील बेल्लारे, पुत्तूर, सुल्या, कडबा येथे हिंदू संघटनांनी आज बंद पुकारला आहे. बेल्लारी येथील मुस्लिम तरुण मसूदच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 5 विशेष पथके तयार केली आहेत. यातील तीन पथके केरळच्या मडिकेरी आणि हसन येथे गेले आहेत.