Black cocaine designer drugs: भारतात विविध राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्सविरोधात जोरदार कारवाई पाहायला मिळत आहे. आता गुजरातमधून ड्रग्स तस्करीचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. अहमदाबादच्या SVPI विमानतळावर झालेल्या कारवाईत 3.22 किलो 'ब्लॅक कोकेन' जप्त करण्यात आले आहे. याला डिझायनर औषध असेही म्हणतात. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, 'ब्लॅक कोकेन' जप्त करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 32 कोटी रुपये आहे.
डीआरआयला गुप्त माहिती मिळाली होती की, साओ पाउलो विमानतळ ते अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणारा एक ब्राझिलियन व्यक्ती भारतात कोकेन तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या ब्राझिलियनला अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवले. हा प्रवासी टुरिस्ट व्हिसावर प्रवास करत होता. प्रवासी आणि त्याच्या बॅगची कसून तपासणी केली असता त्यात लपवलेले ड्रग्स आढळून आले नाही.
डीआरआय अधिकार्यांना आढळले की, दोन्ही पिशव्यांच्या तळाशी आणि साईडला जाड रबरासारखा पदार्थ ठेवला होता. फॉरेन्सिक सायन्स लॅबमधील अधिकार्यांच्या पथकाने विशेष फील्ड-चाचणी किटच्या मदतीने या पदार्थाची तपासणी केली, ज्यामुळे हे कोकेन असल्याचे समोर आले. यानंतर एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार हे 3.22 किलो औषध जप्त करण्यात आले. प्रवाशाने कोकेनच्या तस्करीत सक्रिय भूमिका कबूल केल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.
ब्लॅक कोकेन म्हणजे काय?'ब्लॅक कोकेन' हे डिझायनर ड्रग आहे. हे औषध कोकेनमध्ये कोळसा आणि इतर रसायने घालून तयार केले जाते. यामुळे हे कोकेन सहज ओळखता येत नाही. प्रथमदर्शी हे रबर असल्याचे जाणवते. कधीकधी स्निफर डॉग्स आणि फील्ड-टेस्टिंग किटदेखील हे तपासू शकत नाही. कोकेन तस्करीची ही युक्ती अतिशय अनोखी आहे. डीआरआयच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून 'ब्लॅक कोकेन' जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.