सांगली : शेती वापरासाठीचा युरिया इंडस्ट्रीज वापरासाठीच्या बॅगमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्याचा कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी कडेगावमध्ये भांडाफोड करीत सुमारे ३८ लाखांचा युरिया जप्त केला. गोदाम व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.गोदामामध्ये शेती वापरासाठीच्या दोन हजार ७२९ मोकळ्या बॅगा आढळून आल्या आहेत. या बॅगांवर इंडस्ट्रीज वापरासाठीचा युरिया असा शिक्का आहे. ही बनवेगिरी करणारा कोट्यधीश झाल्याची चर्चा आहे. याचे लागेबंधे पोलीस चौकशीतून समोर येतील.
इंडस्ट्रीजसाठी युरिया का लागतो?खासगी कंपन्यांना गम तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युरिया लागतो. इंडस्ट्रीज वापराच्या युरियाची किंमत ५० किलोला १,७५० रुपये आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शासनाकडून ४५ किलोची बॅग २६६.५० रुपयेमध्ये मिळत आहे. इंडस्ट्रीजचा युरिया महाग असल्यामुळे उद्योजक गम करण्यासाठी दुकानदारांना हाताशी धरून शेतीच्या युरियाचा वापर करतात.