लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सात इंजेक्शन आणि रोकड जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यात एका नगरसेवकाच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनोज वामनराव कामडे (वय ४०, रा. जुनी शुक्रवारी), अतुल भीमराव वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदीक लेआऊट), पृथ्वीराज देवेंद्र मोहिते (वय ३६, रा. रहाटे कालोनी), अनिल वल्लभदास ककाणे (वय ५२, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक) आणि अश्विन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे लेआउट, नरेंद्रनगर) अशी या टोळीतील भामट्यांची नावे असून, कामडे आणि वाळके या टोळीचे सूत्रधार असल्याचे समजते.
आरोपी वाळके आणि कामडे यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शन असून ते त्याची ब्लॅकमार्केटिंग करीत असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना कळली. त्यानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी कारवाईचा सापळा रचला. त्यानुसार, आरोपी कामडेवर पोलिसांनी नजर रोखली. सायंकाळी तो वर्धा मार्गावर रेमडेसिविर घेऊन आला. तो एका ग्राहकाला ती विकणार होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची डिक्की तपासली असता त्यात तीन रेमडेसिविर सापडले. नातेवाईक भरती असल्यामुळे त्याला ते देत असल्याचे कामडेने सांगितले. कोणता नातेवाईक, कुठे आहे, या प्रश्नावर त्याने थाप मारली. पोलिसांनी संबंधित ईस्पितळात चौकशी केली असता कामडे खोट बोलत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविला. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. तेथेही दोन इंजेक्शन सापडले. नंतर कामडेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल वाळकेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन रेमडेसिविर सापडले. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी मोहिते, ककाणे आणि शर्मा या तिघांना ताब्यात घेतले.राजकीय वर्तुळात खळबळत्यांची रात्रीपर्यंत पोलीस चाैकशी करीत होते. प्राथमिक चाैकशीत कामडे नगरसेवकाचा नातेवाईक आणि वाळके बांधकाम व्यावसाियक असल्याचे पुढे आल्याचे समजते. दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणारी टोळी नगरसेवकाचा नातेवाईक संचलित करीत असल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलीस मात्र या संबंधाने स्पष्ट बोलायला तयार नव्हते.४५ हजारांत एक इंजेक्शनसूत्रांच्या माहितीनुसार, एका एका रेमडेसिविरसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीट करीत असताना या टोळीचे म्होरके कामडे आणि वाळके यांनी हे इंजेक्शन कुठून आणले ते सांगायला तयार नव्हते. मात्र, त्यांनी एक इंजेक्शन ४५ हजारांत विकणार होतो, अशी कबुली दिल्याचे समजते.