हैदराबाद - हल्ली तरुण - तरुणी आपल्या प्रत्येक गोष्टींची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सोशल माध्यमांवर दररोज लाखो तरुण मंडळी फोटो अपलोड करतात. मात्र, या फोटोचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते. थोडाफार असाच एक धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये उघड झाला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून एका तरुणाने तब्बल ३०० महिलांना फसवले आहे. याप्रकरणी हैदराबादच्या सायबर विभागाने २५ वर्षीय ठग विनोदला बेड्या ठोकल्या आहेत.
विनोद मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी आहे. त्याने सोशल मीडियाचा गैरवापर करत ३०० महिलांची फसवणूक केली आणि त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद हा मोबाईलच्या दुकानात काम करत होता आणि फेसबुक, व्हॉट्स - अप, इन्स्टाग्रामसह इतर ऍपवरून मुलींचे फोटो डाऊनलोड करायचा आणि पॉर्न वेबसाईटवर त्यांच्या नंबरसह अपलोड करायचा. यानंतर विनोद त्याच नंबरवर फोन करून तुमचा फोटो पॉर्न वेबसाईटवर पाहिला असून मी सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे सांगायचा. नंतर मुलींना तो फोटो पॉर्न वेबसाइटवरून काढण्याबाबत सांगून पॉर्न वेबसाईटवरून फोटो हटवण्य़ासाठी तो मुलींकडे पैशांची मागणी करत असे. एका पीडितने सलग चार महिने १० - १० हजार रुपये त्याला दिले. त्यानंतरही तो पैशांची मागणी करत राहिल्याने तिला संशय आला. तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो डेटिंग ऍप आणि पॉर्न वेबसाईटवर टाकले. पीडितेने याची तक्रार सायबर सेलकडे केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनोद कुमारला अटक केली.
आरोपी नवीन सीम कार्ड खरेदी करून फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि विविध डेटिंग ऍपवरून मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर मिळवायचा. तसेच त्यांना फोन करून ती खरोखरच मुलगी आहे का याची खात्री करून त्यानंतर त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून ब्लॅकमेल करायचा. ब्लॅकमेलसह आरोपी मुलींना सेक्सचॅट करण्यासाठीही दबाव टाकत असे अशी माहिती पोलिसांनी दिली.