सदानंद नाईक
उल्हासनगर : घर वाटणीच्या वादातून सख्या भावाने मोठया भावाचा लोखंडी पाईपने मारहाण करून ठार केले. बुधवारी रात्री साडे दहा वाजता खुनाची घटना घडली असून पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरातील भीमनगर मध्ये विठ्ठल पांडुरंग कदम हे आई जनाबाई, पत्नी व मुलांसह राहतात. विठ्ठल कदम यांचा लहान भाऊ संतोष पांडुरंग कदम हा १९ मे रोजी घरी येऊन, आई जनाबाई हिच्या सोबत घराच्या वाटणीवरून भांडण सुरू केले. यावेळी विशाल याने वडील विठ्ठल पांडुरंग कदम यांना फोन करून घरी बोलावून घेतले. विठ्ठल यांनी भावाला समजावून सांगून त्याच्या घरी पाठविले. यावेळी तुम्हांला बघून घेईल अशी धमकी संतोष याने भाऊ विठ्ठल यांना दिली होती. मात्र घरातील किरकोळ भांडण असल्याने, विठ्ठल कदम यांनी दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री साडे दहा वाजता विठ्ठल कदम भीमनगर हिम्मत जेठानी चौकात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी नशेत असलेल्या संतोष याने मोठ्या भावाला घर वाटणीच्या जाब विचारून लोखंडी पाईपने मारहाण केली.
संतोष कदम यांच्या लोखंडी पाईपच्या मारहाणीत मोठा भाऊ विठ्ठल कदम याचा जागीच मृत्यू झाला. सदर प्रकार उल्हासनगर पोलिसांना मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस संतोष कदम याचा शोध घेत असून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसापूर्वी २० रुपये दिले नसल्याच्या रागातून, अनिल आहुजा यांचा खून झाल्याची घटना घडली होती. शहरात गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असल्याने, नशेच्या धुंदीत खून होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. गावठी दारूचे अड्डे व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. तसेच पोलिसांच्या कर्त्याव्यवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.